शालेय पोषण आहारचे तीन ट्रक जप्त

चिमुकल्यांचा घास काळ्या बाजारात जात असताना शालेय पोषण आहारचे तीन ट्रक जप्त 



हिमायतनगर(अनिल मादसवार)शालेय पोषण आहाराचा तांदूळ व अन्य साहित्य चोरट्या मार्गाने जात असताना सरसम येथील सदगुरू खवा सेन्टरवर काल रात्री ९ वाजेच्या दरम्यान पकडण्यात आला. हा प्रकार जागरूक राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सरदार खान यांनी पुढाकार घेवून पोलिस, महसूल विभाग व पत्रकार यांच्या निदर्शनास आणून दिल्याने तिन्ही ट्रक जप्त करून मध्यरात्री येथील तहसील कार्यालयात उभे करण्यात आले होते. तब्बल २४ तास झाले तरी पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात पोलिस व्यस्त असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे तालुका परिसरात महसूल, पंचायत व पोलिसांच्या कार्यवाहीबाबत उलट सुलट चर्चेला उधान आले आहे.  

याबाबत सविस्तर असे कि, नांदेड - किनवट राज्य रस्त्यावर असलेल्या सरसम येथील सदगुरू खवा सेन्टरवर बर्याच दिवसापासून राजरोसपणे शालेय पोषण आहाराचे तांदूळ व इतर साहित्य साठवणूक करून काळ्या बाजारात विकत असल्याचा प्रकार घडत असल्याचे काही प्रत्यक्ष दर्श नागरिकांनी सांगितले होते. याच बाबीची शहानिशा करण्यासठी सदरील खव्वा सेन्टरवर काही जागरूक नागरिक व पत्रकारांनी पळत ठेवली. आणि दि.१४ रोजी रात्री ०९.३० च्या सुमारास ट्रक क्र.एम.एच.२१-९९६७, एम.एच.२६-एच.४२९९, एम.एच.२६-६४१२, हे शालेय पोषण आहाराचे साहित्य खव्वा सेन्टरवर उतरवून तांदळाचे कट्टे रिकाम्या खताच्या पोत्यात भरून काळ्या बाजारात विकण्यासाठी पाठवीण्यात येणार होते. त्यात तांदूळ , मिरची पावडर, मासला, जिरे, व मिरे, तेल, मीठ, चवळी, तूरडाळ, हरभरा, हळद, मासला चटणी, मटकी, कांदा, लसुन, जीरा राइस इत्यादी शालेय पोषण आहाराच्या साहित्यासह तीन ट्रक ताब्यात घेतले. गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांना तब्बल २४ तसच कालावधी लागल्याने पोलिसांच्या कार्यक्षमते विषयी प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. 

साठे - लोठे  करण्यात माहीर असलेल्या हिमायतनगर पोलिसानी माहिती विचारण्यासाठी व प्रत्यक्षदर्शी परिस्थिती पाहण्यासाठी गेलेल्या पत्रकारांना शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देवून पिटाळण्याचा प्रयत्न केला. परंतु पत्रकारांनी कश्याचीही तमा न बाळगता जागरूक नागरिकांच्या मदतीने पोलिसांचा साठे लोठे करण्याचा प्रयत्न हाणून पडत वस्तुस्थिती समोर आणून गुन्हा दाखल करण्यास भाग पाडले. लोकशाहीचा चौथा आधार स्तंभ असलेल्या पत्रकारांना धमकी देणाऱ्या व सत्यता समोर आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देवू अरेरावीची भाषा वापरणाऱ्या संबंधित सहाय्यक पोलिस निरीक्षकाची तत्काळ उचल बांगडी करावी या मागणीसाठी पत्रकारांचे एक शिष्टमंडळ पोलिस अधीक्षक विठ्ठल जाधव यांची लवकरच भेट घेणार असल्याचे समजते.  

या विषयी हिमायतनगर गटशिक्षण अधिकारी यांच्याशी संपर्क साधून शालेय पोषण आहारची माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता ते नोट रिचेबल होते. तर पुरवठा विभागाचा एकही कर्तव्य दक्ष अधिकारी इकडे फिरकला नसल्याने शालेय पोषण आहारच काळा बाजार करणारे मोठे रैकेट कार्यरत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

प्रभारी तहसीलदार गायकवाड यांनी काल घटनास्थळीच भेट देवून जप्त करण्यात आलेल्या गाड्यांचा पंचनामा करून पोलिसांच्या स्वाधीन केल्या असल्या तरीही ह्या गाड्या आज दुपारी शासकीय धान्य गोदामात खाली करण्यात आल्या असून, रिकाम्या गाड्या पोलिस स्थानकात कोणत्या उद्देशाने पाठविल्या हा प्रश्न अनुत्तरितच आहे.   

यातील बडे दलाल सोडून थातूर - माथुर कार्यवाही करण्याच्या उद्देशाने गुन्हा दाखल करण्यासठी दिरंगाई केली कि काय..? असा सवाल उपस्थित होत असताना, फिर्याद देण्यासाठी महसूल अथवा शिक्षण विभागातील कोणताही अधिकारी पुढे आला नसल्याचे कारण देत गुन्हा दाखल करण्यासाठी विलंब झाला असल्याचे कारण देत पोलिस निरीक्षक सुरेंद्र सोनवणे यांनी प्रस्तुत प्रतिनिधीस बोलताना सांगितले.       

शिक्षण विभागाचे गटशिक्षण अधिकारी सुराजुसे यांचा फोन ऐनवेळी बंद आढळून आल्याने अनेक शंका उपस्थित करण्यास वाव मिळाला असून, शिक्षण खात्यातील अधिकाऱ्यांच्या सहमतीने राजरोसपणे शालेय पोषण आहाराचा काळा बाजार बिनदिक्कत पाने चालू आहे कि काय अशी उलट - सुलट चर्चा नागरीकातून होत आहे. सदरील वृत्त लिहीपर्यंत सहाय्यक पोलिस निरीक्षक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी