भरती प्रक्रियेत आर्थिक उलाढाल

अंगणवाडी सेविका - मदतनीसांच्या भरती प्रक्रियेत आर्थिक उलाढालीची चर्चा

हिमायतनगर(अनिल मादसवार)तालुक्यातील अंगणवाडीच्या २३ जगांसाठी सेविका - मदतनीसांच्या रिक्त पदांच्या भरती प्रक्रियेला वेग आला आहे. या जागेसाठी १०० हून अधिक लोकांचे प्रस्ताव आले असून, प्रस्ताव मागविण्या पूर्वीच काही ठराविक ठिकाणच्या जागेवर जवळील लोकांची वर्णी लागणार असल्याने इच्छुकांचा हिरमोड होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या भरती प्रक्रियेत गुणवत्तेला बगल देवून राजकीय वजन वापरून निवड करण्यात येत असल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असल्याची चर्चा प्रस्ताव दाखल करणार्यांमध्ये सुरु आहे.

तालुक्यात पूर्वीच्या अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या मृत्यूमुळे तथा अन्य कारणामुळे रिक्त झालेल्या त्या - त्या ठिकाणच्या अंगणवाडीतील रिक्त जागा भरण्यासाठी दि.२० जानेवारी ते ४ फेब्रुवारी या कालावधीत इच्छूक महिलांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहे. सदर प्रस्ताव दाखल करण्यासाठी महिलांना तलाठी, मंडळ अधिकारी यांच्यासह अनेक ठिकाणी पायपीट करावी लागली, तर बहुतांश ठिकाणी प्रमाणपत्रासाठी रक्कमही मोजावी लागली हि बाब सर्वश्रुत आहे. एवढ्या सर्व अडचणींचा सामना करीत शेकडो महिलांनी अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या २३ जागांसाठी वाघी, वाशी, महदपुर, या तीन ठिकाणच्या अंगणवाडीच्या तीन जागेसाठी १६ महिलांनी तर मदतनीसांच्या १३ जागेसाठी तब्बल ६८ महिलांनी बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयात प्रस्ताव दाखल केले आहेत. मिनी अंगणवाडीच्या ०७ जागेसाठी १७ महिला स्पर्धेत असून, एकूण २३ जागेसाठी तब्बल १०० महिलांनी प्रस्ताव दाखल केले आहेत. या सर्व जागेवरील महिलांची निवड भारती प्रक्रियेतील गुणवत्तेचे सर्व नियम धाब्यावर ठेवून निवड केली जात आहे. तर बऱ्याच महिलांची शैक्षणिक गुणवत्ता कमी असताना देखील केवळ पैश्याच्या जोरावर आपली वर्णी लागावी यासाठी त्यांचे पतीराज धडपडत आहेत. कृषी उत्त्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती दत्ताराम पाटील करंजीकर यांच्या सुविद्ध पत्नी तथा अंगणवाडी निवड समितीच्या अध्यक्षा सौ.वनिता पाटील यांच्या घराचे उंबरवठे झिजवत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्या जरी भारती प्रक्रिया गुणवत्तेच्या आधारावर करण्यात येत असल्याचे सांगत असले तरी, यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होत असल्याचे दस्तूर खुद्द काही महिला उमेदवारांनी नाव न छापण्याच्या अटीवर नांदेड न्युज लाइव्हशि बोलताना सांगितले.

गत भरतीतही झाली होती उलाढाल...

गत अंगणवाडी भरतीमध्ये अंगणवाडी - मदतनीस आणि कार्यकर्तींच्या नियुक्तीसाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होवून, पात्रता नसूनही अनेक कर्मचार्यांची भारती करण्यात आली. होती, यात दस्तुरखुद्द अध्यक्ष यांच्या गावातूनच एका महिलेने या बाबीची तक्रार वरिष्ठांकडे करून न्यायासाठी धडपड केली होती. शेवटी राजकीय षड्यंत्रामुळे सदर महिलेला अपयश मिळाले. तोच प्रकार यावर्षीच्या अंगणवाडी भरतीत होत असल्याचे उघडपणे बोलले जात आहे. त्यामुळे अंगणवाडी भतिल गालबोट लागण्याची चिन्हे दिसत असून, या प्रकाराकडे संबंधित वरिष्ठांनी लक्ष देवून निवडीत केली जाणारी आर्थिक उलाढाल थांबवून खर्या व गुणवत्तापूर्ण महिलांचीच निवड करण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी