महसूल आयुक्तालय

महसूल आयुक्तालय स्थापनाची कार्यवाही लवकर करु - बाळासाहेब थोरात


नांदेड(अनिल मादसवार)उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार महसूल आयुक्तालय नांदेड येथे स्थापन करण्यासाठी लवकरच कार्यवाही सुरु केली जाईल, अशी स्पष्ट ग्वाही राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.

भोकर येथे तहसिल व उपविभागीय महसूल कार्यालय नूतन इमारतीच्या उद्धाटन प्रसंगी महसूल मंत्री थोरात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्यमंत्री आमदार अशोकराव चव्हाण हे होते. नांदेडचा महा-ई सेवा प्रकल्प राज्यात सर्व जिल्ह्यात राबविला जात आहे असे सांगून महसूल मंत्री बाळासाहेब थोरात पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांना ऑनलाईन सातबारा देण्याचे नियोजन येत्या काही महिण्यात पूर्ण होईल. जमिनीचा फेरफार, चर्तुेसिमा, नकाशा ऑनलाईन पाहण्यास मिळेल. दहा वर्षापूर्वीचा जमिनीचा व्यवहार ऑनलाईन सर्च करता येईल. शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था सहकारी साखर कारखानदारीवर अवलंबून आहे. ते एक मोठे कार्य नांदेड जिल्ह्यात सहकारी साखर कारखाने चांगले चालवून शेतकऱ्यांचे जीवनमान बदलविण्याची किमया झाली. असे गौरवपूर्ण उद्गार महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी यावेळी काढले.

माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी भोकर शहराबाहेरुन किनवट-हदगांव बायपास रस्ता तयार करण्याचे सूचित केले. ते म्हणाले की, भोकर शहरात 20 कोटी रुपये खर्चाची नळपाणी पुरवठा योजना राबविण्यासाठी नागरिकांनी लोकवाटा म्हणून लोकवर्गणी जमा करावी. 65 कोटी खर्चून न्यायालय इमारत व 5 कोटी खर्चून नगर परिषद इमारत बांधकाम पूर्ण केले जात आहे. 1 कोटी खर्चून क्रीडा संकुल व 50 लक्ष खर्चून ग्रामीण रुग्णालय इमारत बांधकाम पूर्ण केले जात आहे.

पालकमंत्री डी. पी. सावंत म्हणाले की नांदेड जिल्हा नियोजन समितीच्या विकास आराखडयाचे बाह्य संस्थेतर्फे गत पाच वर्षापासून लेखा परीक्षण होत असल्याने राज्यात प्रथम क्रमाकांवर राहण्याचा बहुमान या समितीने मिळविला आहे. माहिती तंत्रज्ञानाचा वापर करुन जिल्ह्यात लोकोपयोगी योजना राबविण्यात आल्या आहेत. त्यामुळे लोकाभिमुख व शिस्तबध्द प्रशासन या जिल्ह्यात निर्माण झाले आहे.

खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांनी लोकाभिमुख प्रशासकीय सुंदर अशा या इमारतीत गावच्या सरपंचाचा आदर करुन कामे पूर्ण केली पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली.

प्रास्ताविक अधिक्षक अभियंता चंद्रशेखर तुंगे यांनी केले तर जिल्हाधिकारी धीरजकुमार, तहसिलदार महेश परांडेकर इत्यादीने स्वागत केले. आभार प्रदर्शन उपविभागीय अधिकारी केशव नेटके यांनी केले.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर, आ. अमरनाथ राजूरकर, आ. ओमप्रकाश पोकर्णा, बी. आर. कदम, नगराध्यक्ष विनोद चिंचाळकर, सभापती मंगाराणी अंबुलगेकर, शिवाजीराव देवतुळे, सौ. शोभाताई मुंदगल आदी उपस्थित होते. संचालन प्रा. दिपक कासराळीकर यांनी केले. याप्रसंगी कार्यकारी अभियंता वि. रा. धारासुरकर, तोटावार, वनपरिक्षेत्र अधिकारी के. डी. देशमुख, तालुका कृषि अधिकारी रमेश देशमुख यांचेसह अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी