डोईफोडे यांचे निधन

ज्येष्ठ पत्रकार सुधाकरराव डोईफोडे यांचे निधन.. गुरुवारी अंत्यसंस्कार

नांदेड(अनिल मादसवार)व्यासंगी संपादक, ध्येयवादी पत्रकार, सामाजिक विचारवंत, समाजहितासाठी धडपडणारा सामाजिक कार्यकर्ता,लढवय्या स्वातंत्र्य सेनानी,रेल्वे प्रश्‍नाचे गाढे अभ्यासक , सृजनशील लेखक, प्रभावी वक्ते अशा विविध अंगानी केवळ नांदेडच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला व्यापून टाकणारे व्यक्तीमत्व सुधाकर विनायकराव डोईफोडे यांच्या रुपाने आज लोप पावले.दि. २२ जानेवारी रोजी सकाळी १०.३५ मिनिटांनी हैद्राबाद येथील खाजगी रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली, मृत्यू समयी ते ७८ वर्षांचे होते.

गेल्या कांही दिवसांपासून यकृताच्या आजाराने ते त्रस्त होते. नांदेड येथे उपचार केल्यानंतर त्यांना हैद्राबाद येथे हलविण्यात आले. येथे डॉक्टरांनी शर्तीचे प्रयत्न केल्यानंतरही उपचारांना त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुले, सुना, बहिण, पाच भाऊ, नातू - पणतू असा मोठा परिवार आहे. त्यांची अंत्ययात्रा २३ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता निघून त्यांच्या पार्थिवावर सकाळी १०.३० वा. गोवर्धन घाट स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. गेल्या सहा दशंकापासून डोईफोडे यांनी प्रजावाणीच्या माध्यमातून विविध प्रश्‍न व विषयांवर परखडपणे आपली लेखणी चालविली निर्भिड, चतुरस्त्र व दूरदृष्टीचे पत्रकार-संपादक म्हणून ते परिचित होते. त्यांच्या लेखणीला ओघवती शैली असल्याने पत्रकारितेतील स्वयंमेव मृगेंद्रता म्हणून त्यांना गौरविले गेले.

पत्रकारितेतील मानाचे सर्वच पुरस्कार त्यांना प्राप्त झाले होते. मुंबई मराठी पत्रकार संघाचा डहाणूकर पुरस्कार त्यांना तीन वेळा प्रदान करण्यात आला. बाळशास्त्री जांभेकर दर्पण पुरस्कार,विनायकराव चारठाणकर पुरस्कार गौरव पुरस्कार,मीनाताई ठाकरे प्रतिष्ठानचा नांदेड भूषण पुरस्कार, आचार्य अत्रे जन्मशताब्दी समितीचा सर्वश्रेष्ठ पुरस्कार,नांदेड जिल्हा परिषदेच्यावतीने दिला जाणारा नरहर कुरूंदकर पुरस्कार त्यांच्या यशस्वी कारकिर्दीला अधोरेखित करतातप्रजावाणीतील विविध विषयांवर लिहिलेल्या व प्रचंड गाजलेल्या अग्रलेखांचा शब्दबाण हा संग्रह त्यांच्या साक्षेपी लिखाणाची साक्ष देतात. हैद्राबाद मुक्ती संग्रामातील लक्षणीय प्रसंगावर लिहिलेले प्रतर्दनाचे दिवस हे पुस्तक वाचक प्रिय ठरले. हैद्राबाद मुक्ती संग्रामावरच लिहिलेली त्यांची परवड ही कादंबरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात अभ्यासक्रमात होती. महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङमयनिर्मितीचा पुरस्कार शब्दबाणला प्रदान करण्यात आला. डोईफोडे यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामात सक्रीय सहभाग नोंदविला.वयाच्या ११ वर्षी मनाई आदेश मोडून त्यांनी निजाम विरोधातील मोर्चात सहभाग नोंदवून आपला निषेध नोंदविला होता. यासाठी पोलिसांच्या काठ्याही खाव्या लागल्या. या आंदोलनात रस्त्यावरील बल्ब फोडणे, अमन कमेटिच्या सदस्यांवर शेणाचा मारा करणे,पॉम्प्लेट वाटणे,हत्यारांची वाहतूक करणे आदि कामे त्यांनी केली होती.

आणीबाणीतील सत्याग्रहामुळे त्यांना १५ दिवसांची शिक्षाही भोगावी लागली. समाजवादी विचारसरणीचा पगडा असणार्‍या डोईफोेडेंनी पुणे विद्यापीठातून कायद्याची पदवी प्राप्त केली होती. रेल्वे प्रश्‍नाचे गाढे अभ्यासक म्हणून ते केवळ मराठवाड्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात ओळखले जात, रेल्वेंच्या न्याय मागण्यासाठी अनेकवेळा ते रस्त्यावर उतरले होते. विविध नियतकालिकामधून अगणित लेख लिहून डोईफोडे यांनी रेल्वे रूंदीकरणाची चळवळ जिवंत ठेवली होती. १९५२ पासून मनमाड ते नांदेड ब्रॉडगेज व्हावे म्हणून ते प्रयत्नशील होते. रेल्वे प्रश्‍नावर त्यांनी वेळोवेळी व्यापक आंदोलने उभारली व त्या प्रश्‍नांची जाण संबंधितांना करवून दिली. डोईफोडे यांचे नांदेड शहराच्या विकासात लक्षणीय योगदान होते. त्यांच्या अग्रलेखाचे महत्वाचे वैशिष्टय म्हणजे स्थानिक प्रश्‍नांना प्राधान्य देणे हे होते. राष्ट्रीय नेत्यावर कोणीही लिहिल पण एखाद्या स्थानिक नेत्याचा समाचार घेणे अवघड असते. या संदर्भात सुधाकररावांची लेखणी नेहमीच पारदर्शी रहिलेली आहे. दीन पिडीतांना अंतर देऊ नये | जुलमी मदाधांची गय करु नये | हे त्यांनी प्रजावाणीला दिलेले ब्रिद शेवटपर्यंत स्वतः पाळले.

१९६७ ते १९७४ आणि १९८४ ते १९९१ या काळात त्यांनी नगरसेवक म्हणून विविध प्रश्‍नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले. तत्कालीन नगरपालिकेचे शिक्षण सभापती म्हणून काम करताना त्यांनी कै.नरहर कुरूंदकर आणि शंकरराव चव्हाण व्याख्यानमाला सुरू केल्या होत्या. त्यांच्याच कार्य काळात डॉ.राम मनोहर लोहिया वाचनालयात दोन लाख रूपयांची अभिजात मराठी,इंग्रजी पुस्तके आणली. त्या विचारधनाचा लाभ हजारो नांदेडकरांना मिळाला.शिक्षण सभापती असताना त्यांनी तीन नव्या प्राथमिक शाळाही सुरू केल्या होत्या तसेच नगरपालिकेंच्या शाळेमध्ये आदर्श शिक्षक पुरस्कार सुरू करून त्यांनी शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या व्यक्तींना गौरविण्याचा पायंडा निर्माण केला होता. पत्रकार म्हणून विविध विषयांवर लेखणी चालवताना डोईफोडे यांनी भाववाढ विरोधी आंदोलन,संयुक्त महाराष्ट्र आंदोलन,कच्छ बचावो आंदोलन, भूमीमुक्ती आंदोलन, मराठवाडा विकास आंदोलन, लाखोळी डाळीवरील निर्बंध हटावचे आंदोलन आदीत महत्वाचे योगदान दिले. मराठवाडा साहित्य परिषद, मराठवाडा रेल्वे संघर्ष समिती व मराठवाडा जनता विकास परिषद आदि संस्था व चळवळीत काम करताना त्यांनी चतुरस्त्र व्यक्तीमत्वाचा ठसा उमटवला होता. सुधाकरराव डोईफोडे, रामेश्‍वर बियाणी आणि डॉ. नंदकुमार देव या तिन मित्रांनी एकत्र येऊन साप्ताहिक प्रजावाणी सुरु केले. त्यानंतर साप्ताहिकाचे दैनिकात रुपांतर करुन ते वाचक प्रिय ठरविले. डोईफोडे यांच्या अग्रलेखामुळे प्रजाावाणीचा प्रवास नांदेड शहरापासून सुरु होऊन तो मुंबईलतल्या मंत्रालयापर्यंत पोहचला होता. विविध प्रश्‍नांवर डोईफोडे यांना जे-जे वाटत होते ते ते त्यांनी विविध वृत्तपत्रातूनही लेखन करुन प्रगट केले. सामाजिक भान आणि संवेदनशील जाणीवा त्यांच्या प्रत्येक कृतीतून उमटत होत्या. सामाजिक प्रश्‍नांसाठीचा हा संवाद अखेर पर्यंत सुरूच होता. अगदी अखेरच्या क्षणापर्यंत त्यांनी आपल्या सूचना व मते ठामपणे नोंदवली. रूग्णालयात उपचार सुरू असताना देखील त्यांनी दूरध्वनीवरून रेल्वे प्रश्‍नावर सुरू असलेल्या बैठकीत आपल्या सूचना हिरीरीने मांडल्या. विधायक कामांसाठी प्रेरणा देणारी त्यांची लेखणी आणि वाणी अखेर शांत झाली.सुधाकरराव डोईफोडे यांचे निधन झाल्याचे वृत कळताच सकाळपासूनच विविध क्षेत्रातील मान्यवरांची प्रजावाणी कार्यालयात गर्दी झाली होती. विविध वयोगटाचे व विचारसरणीच्या व्यक्तीमत्वांचा यात समावेश होता. यावेळी सर्वानीच व्यक्ती केलेल्या शोक संवेदना सुधाकररावांवरील प्रेमाची पावती देत होते. नांदेडकरांना त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेता यावे यासाठी दि.२३ जानेवारी रोजी सकाळी ८ ते १० या वेळेत त्यांचे पार्थिव त्यांच्या भाग्यनगर येथील निवासस्थानी ठेवला जाणार आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी