लाच घेतांना पोलीस निरीक्षक अटक

११ हजाराची लाच घेतांना पोलीस निरीक्षक जमादाराला पकडले

नांदेड(अनिल मादसवार)अपघात गुन्ह्याची नोंद न करण्यासाठी मुंबईच्या एका व्यक्तीकडून ११ हजार रुपयांची लाच घेतांना हदगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजा मुंजाजी टेहरे व त्याच ठाण्यातील पोलीस जमादार लक्ष्मीकांत धोंडोपंत कुलकर्णी या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विरोधी पथकाने बुधवारी (दि. १३) दुपारी ४.३० वाजता रंगेहाथ पकडले. या घटनेमुळे पोलीस विभागात एकच खळबळ उडाली असून पोलीस ठाण्याच्या प्रमुखाला त्याच ठाण्यात रंगेहाथ पकडल्याची आणि त्याच ठाण्यात गुन्हा दाखल होण्याची बहुधा ही पहिलीच वेळ असावी. नांदेड जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात लाच घेतल्याशिवाय कामेच होत नाहीत. ही घटना आजच्या प्रकाराने स्पष्ट झाली आहे.

याबाबतची हकीकत अशी की, अजयकुमार किशनदेव फेकी रा. कंबोली पनवेल हे हदगावच्या पोलीस ठाण्यात आले. मागे झालेल्या अपघात गुन्ह्याची नोंद न करण्यासाठी त्यांनी पोलीस निरीक्षक टेहरे यांना विनंती केली. परंतु पैसे घेतल्याशिवाय कोणाची कामेच करायची नाहीत असा हदगाव ठाण्याचा शिरस्ता राहिला आहे. परंतु पोलीसांनी मागितलेली रक्कम देण्यास फेकी हे असमर्थ होते. त्यांनी लगेचच नांदेडला स्नेहनगर भागात असलेल्या लाचलूचपत प्रतिबंधक विरोधी कार्यालयात लेखी तक्रार दिली. त्यानुसार पोलीस उपअधीक्षक पठाण, पोलीस निरीक्षक राहीरे यांच्या नेतृत्वाखाली एक सापळा रचण्यात आला. आणि या सापळ्यात पोलीस निरीक्षक टेहरे, त्यांचे विश्‍वासू सहकारी कुलकर्णी आपोआपच जाळ्यात सापडले. रोख ११ हजाराची रक्कम घेतांना दोघेही पकडले गेले. ऍन्टी करप्शनच्या जाळ्यात आडकल्यानंतर दोघांचीही पाचावर धारण उडाली. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून दररोज प्रेसनोट काढण्यात येते. हदगावच्या ठाण्यात महत्वाची घटना घडलेली असतांना जनसंपर्क कार्यालयाला त्याची माहिती नव्हती. थांबा, पाहतो, बघतो म्हणून वेळ मारून नेण्यात आली. पत्रकारांनी हदगावच्या पोलीस ठाण्यास फोन केला असता अजून गुन्हा दाखल झालेला नाही, घटना खरी आहे असे जुजबी उत्तर ठाणे अमलदारांनी दिले. लाईट गेली आहे, नंतर फोन लावा असे सांगून फोन आदळून ठेवण्यात ठाणे अंमलदाराने धन्यता मानली. ठाण्याचा प्रमुखच ऍन्टी करप्शनच्या जाळ्यात सापडल्यामुळे ठाणे अंमलदार ठाण्याची अब्रू उघड पडली आहे. जिल्हा पोलीस  अधीक्षक कार्यालयात सुद्धा फोन केला असता फोन कोणी उचलला नाही. हदगावच्या आजच्या घडनेचे पडसाद सर्वच पोलीस ठाण्यापर्यंत बिनतारी यंत्रणेद्वारे गेले असावेत, पोलीस निरीक्षक टेहरे हे यापूर्वी नांदेड, माहूरला सुद्धा  कार्यरत होते. सध्या ते हदगावला कार्यरत असून त्यांचा कारभार किती  वादग्रस्त आहे हे पुन्हा एकदा उघड झाले आहे

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी